Ad will apear here
Next
बाबा आमटे, राजा परांजपे, शोभना समर्थ, मीना शौरी
ख्यातनाम समाजसेवक बाबा आमटे, नामवंत अभिनेते-दिग्दर्शक राजा परांजपे, अभिनेत्री शोभना समर्थ आणि अभिनेत्री मीना शौरी यांचा नऊ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांचा हा अल्प परिचय...
.........
बाबा आमटे
२६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिह्यातल्या हिंगणघाट येथे बाबा आमटे यांचा जन्म झाला. समाजाने दूर लोटलेल्या कुष्ठरोग्यांवर प्रेमाची पाखर घालणारे, त्यांच्यातला आत्मसन्मान जागवणारे, त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद जागवणारे बाबा म्हणजेच मुरलीधर देविदास आमटे. बाबांचं घराणं सधन जहागीरदाराचं. त्यांचे वडील देविदास ब्रिटिश सरकारमध्ये अधिकारी होते. मुरलीधर आमटे यांना त्यांच्या लहानपणीच बाबा हे टोपण नाव मिळालं होतं. बाबांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि वर्धा येथे त्यांनी वकिलीही केली. ते यशस्वी वकील म्हणून नावाजले होते; पण तिथे त्यांचं मन रमलं नाही. त्यांनी वकिली सोडून स्वातंत्र्य चळवळीत स्वत:ला झोकून दिलं. बेचाळीसच्या चले जाव चळवळीत त्यांना कारावासाची शिक्षाही झाली. महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात काही काळ वास्तव्य केल्यानंतर गांधींच्या विचारांचा त्यांच्यावर खूप परिणाम झाला. 

म. गांधींबरोबरच रवींद्रनाथ टागोर, विनोबा भावे आणि साने गुरुजी ही बाबांची श्रद्धास्थानं होती. १९४६ साली त्यांचा साधना गुलेशास्त्रींशी विवाह झाला. साधनाताई बाबांच्या सर्व सामाजिक कार्यांमध्ये खांद्याला खांदा लावून सहभागी झाल्या आणि आयुष्यभर त्यांना साथ दिली. बाबा एकदा मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला भिजत, विव्हळत असहाय्यपणे पडलेल्या एका कुष्ठरोग्याला त्यांनी पाहिले आणि त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला. बाबांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. महारोग्यांच्या पुनर्वसनासाठी आनंदवन हा आश्रम आणि अपंगांसाठी आणि समाजातल्या रंजल्या-गांजल्यांसाठी आणखी दोन आश्रम सुरू केले. पर्यावरण, वन्यप्राणी संरक्षण आणि नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतरही अनेक सामाजिक-पर्यावरणसंबंधित चळवळींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. ज्या काळात त्यांनी महारोग्यांच्या पुनर्वसनाचं कार्य हाती घेतलं, त्या काळात महारोग हा महाभयंकर समजला जात होता. महारोग्यांना कुणी जवळ करीत नसे. त्यामुळे त्यांच्या नशिबी अस्पृश्यांसारखे जीणे येत असे. असहाय्य रोगाने गांजलेले हे रोगी त्यामुळे मानसिकरित्याही खचून जात असत. समाजात त्यांना वावरताही येत नसे. त्या काळात असाही गैरसमज होता की महारोग हा संसर्गजन्य असतो. जनमानसातला हा गैरसमज दूर करण्यासाठी बाबांनी एका महारोग्याचे जंतू आपल्या नसांत इंजेक्शनने टोचून घेतले. 

आज आनंदवनात एक सुसज्ज हॉस्पिटल आहे, शाळा आहे आणि अनाथाश्रमही आहे. आनंदवनात पाच हजारांपेक्षाही जास्त लोक वास्तव्याला आहेत. ‘आनंदवन’चा प्रकल्प जगातील एक मान्यताप्राप्त प्रकल्प आहे. समाजकार्याबरोबरच मोजकंच पण अतिशय सशक्त लेखनही त्यांनी केलं. ‘ज्वाला आणि फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह अनेक तरुणांना प्रेरणा देऊन गेला. ‘उज्ज्वल उद्यासाठी’ हा काव्यसंग्रह आणि ‘माती जागवील त्याला मत’ ही त्यांची पुस्तकंही गाजली. 

बाबांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलं. कुष्ठरोग्यांसाठी कार्य करणाऱ्यांसाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे अमेरिकेचा डेमियन डट्टन पुरस्कार. हा पुरस्कार त्यांना १९८३मध्ये प्रदान करण्यात आला. १९८५ साली आशियाचं नोबेल पारितोषिक समजल्या जाणाऱ्या रेमॉन मॅगसेसे पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि संयुक्त राष्ट्राने १९९१ आणि १९९८ साली त्यांचा सन्मान केला. या व्यतिरिक्त त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. भारत सरकारने १९७१ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित केलं. महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुले पुरस्कार त्यांना १९९८ साली देण्यात आला आणि २००४ साली त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अखेरची काही वर्षं त्यांना शारीरिक व्याधीमुळे बसता येत नव्हतं, त्यांना सतत झोपून राहावं लागायचं. पण तरीही त्यांच्या कार्यांमध्ये कोठेही खंड पडला नाही. त्यांची दोन्ही मुलं विकास आणि प्रकाश आणि सुना मंदाकिनी आणि भारती हे सर्व डॉक्टर आहेत आणि वडिलांचा समाजकार्याचा वारसा समर्थपणे सांभाळीत आहेत. त्यांच्या नातवंडांची म्हणजेच तिसरी पिढीही आता समाजकार्यात कार्यरत आहे. बाबा आमटे यांचे नऊ फेब्रुवारी २००८ रोजी निधन झाले. 
........
राजा परांजपे 
२४ एप्रिल १९१० रोजी राजा परांजपे यांचा जन्म झाला. राजा परांजपे यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला तो नट वा सहायक दिग्दर्शक म्हणून नव्हे, तर संगीत विभागात ‘ऑर्गन वादक’ म्हणून! राजाभाऊंना संगीताचं उपजतच वेड होतं. हा वारसा त्यांना त्यांच्या आईकडून लाभला. विद्यार्थिदशेतच ‘भारत गायन समाजा’च्या कै. बापूराव केतकरांनी त्यांच्या संगीतवेडाला चांगलं वळण दिलं. नवनवी नाटके आणि सिनेमा बघण्याचे वेड त्यांना लागले; पण रोज रोज नाटक, सिनेमा पाहायचं म्हटलं तर पैशाची चणचण त्यांना भासू लागली. त्यासाठी त्यांच्या संगीतवेडातूनच त्यांना एक नवीन मार्ग सापडला. राजा परांजपे यांची अभिनयातील समज पाहून तिथेच त्यांना ‘लपंडाव’ या नाटकात अचानक संधी मिळाली. या नाटकातील एक कलाकार अचानक नाटक सोडून गेला. दात्ये यांनी त्याच्या जागी राजा परांजपेंना संधी दिली, त्या संधीचे त्यांनी चीज केले. पुढे केशवराव दात्ये यांनीच त्यांना ‘सावकारी पाश’ या चित्रपटातील भूमिका मिळवून दिली. 

त्यानंतर ते भालजी पेंढाकर यांच्याकडे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. भालजींच्याच काही चित्रपटांत त्यांनी अभिनयही केला. ‘सावकारी पाश’मधील भूमिकेनंतर ते छोटी मोठी कामे करत होते; पण खऱ्या अर्थाने ते दिग्दर्शक झाले ते १९४८ मध्ये ‘बलिदान’च्या माध्यमातून आणि यशाची बरसात झाली ती ‘जिवाचा सखा’ या चित्रपटाने. मराठी चित्रपटाच्या सुवर्णकाळातील सर्वांत यशस्वी त्रयी म्हणजे राजा परांजपे, सुधीर फडके आणि ग. दि. माडगूळकर होय. ग. दि. माडगूळकर यांच्या पटकथेवर राजाभाऊ आपल्या दिग्दर्शन कौशल्याचा असा काही प्रभाव पाडत, की तो चित्रपट वेगळाच होऊन जाई. शब्दप्रभू माडगूळकरांयांनी राजा परांजपेंना परिसाची उपमा दिली होती. ‘तुमच्या पटकथेवर इतरांना राजा परांजपेंच्याइतके यश का नाही मिळवता आले,’ असे त्यांना एकदा विचारले असता गदिमा म्हणाले ‘राजाभाऊ हे परिसासारखे आहेत, त्यामुळे त्यांच्यासारखी किमया इतरांना कशी जमेल?’ 

राजा परांजपे यांनी केवळ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले असे नाही, तर त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चार हिंदी चित्रपटांनाही चांगले यश मिळाले. त्यातील ‘दो कलियाँ’ हा चित्रपट तर प्रचंड यशस्वी ठरला होता. आज आपण अनेक दिग्दर्शकांच्या वैविध्यपूर्ण शैलींबद्दल बोलत असतो; पण कोणताही गाजावाजा न करता राजाभाऊ वेगवेगळ्या प्रकृतीचे चित्रपट त्या काळात दिग्दर्शित करत होते आणि यश मिळवत होते. ‘पुढचं पाऊल’, ‘ऊन पाऊस’, ‘देवघर’ यासारखे कलात्मक चित्रपट राजा परांजपे यांनी यशस्वी करून दाखवले होते. राजा परांजपे यांनी दिग्दर्शन केले आणि ज्यामध्ये त्यांनी स्वतः काम केले अशा ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाची सगळीकडेच वाहवा झाली, त्याचबरोबर या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदकही मिळाले होते. अर्थात, हा बहुमान त्यांना दोनदा मिळाला होता. ‘पाठलाग’ या रहस्यप्रधान चित्रपटालाही राष्ट्रपतींचा पुरस्कार मिळाला होता. हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड मानला जातो. त्याचबरोबर या चित्रपटाचे यश पाहून हिंदीमध्येही त्याचा रीमेक केला गेला. ‘मेरा साया’ नावाने हा चित्रपट हिंदीत आला. 

नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजा परांजपेंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. भूमिका कोणतीही असो, मग ती विनोदी असो की कौटुंबिक अथवा कारुण्यमयी, राजाभाऊ त्या भूमिकेला आपला रंग देत असत. हेच कौशल्य त्यांनी चित्रपट दिग्दर्शित करताना ठेवले, त्यामुळे एकाच वेळी भिन्न प्रकृतीच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही त्यांनी त्यामध्ये लक्षणीय यश मिळवले. व्ही. शांताराम यांनी त्यांची तुलना करताना त्यांना सत्यजित रे यांच्यापेक्षा अधिक गुण दिले होते. कोणत्याही चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना ते त्या चित्रपटाचेच होऊन जात असत, त्या वेळी दुसरा विचारच त्यांना सुचत नसे. २७ चित्रपटांचे दिग्दर्शन केलेल्या या माणसाचे पाय शेवटपर्यंत जमिनीवर होते. अनेकांना चित्रपटसृष्टीत उभे केलेल्या या दिग्दर्शकाने आपल्या काळात अक्षरशः राजासारखे राज्य केले. शरद तळवलकर, सीमा आणि रमेश देव, राजा गोसावी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर व सचिन पिळगावकर यांच्यात एक समान बाब कोणती असे विचारले, तर चटकन सांगता येईल ती म्हणजे, ही सर्व मंडळी एका स्कूलची आहेत. स्कूल अर्थातच राजा परांजपे यांचं. या मंडळींच्या कारकिर्दीला सर्वाधिक आकार दिला तो राजा परांजपे या कसबी दिग्दर्शकाने. राजा परांजपे यांचे नऊ फेब्रुवारी १९७९ रोजी निधन झाले. 
....
शोभना समर्थ
१७ डिसेंबर १९१६ रोजी शोभना समर्थ यांचा जन्म झाला. शोभना समर्थ यांचे वडील बँकेचे संचालक होते. शोभना समर्थ म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या नूतन व तनुजा यांच्या मातोश्री व काजोल, मोहनीश बहलची आजी. वडिलांच्या मृत्यूनंतर मामा जयवंत (नलिनी जयवंतचे वडील) यांच्याकडे त्यांचे संगोपन झाले. मामाच्या कडक अनुशासनात राहूनही त्या चोरून चित्रपट बघायच्या व सिनेतारका होण्याचे स्वप्न बाळगायच्या. वयाच्या १८व्या १९३४ साली ५०० रुपये पगारावर ‘निगाह-ए-नफरत’ या मास्टर विनायक निर्मित चित्रपटात त्यानी काम केले. हाच चित्रपट १९३५ साली मराठीत ‘विलासी ईश्वर’ म्हणून निघाला. त्या तारका बनल्या. शोभना समर्थ यांचे माहेरचे नाव सरोज शिलोत्री. जर्मनीहून सिनेमेटोग्राफीचे प्रशिक्षण घेऊन आलेले कुमार सेन समर्थ यांच्यासोबत त्याचा विवाह झाला. सरोज शिलोत्रीची ‘शोभना समर्थ’ झाल्या. 
त्या काळातील मातब्बर कलाकार मोतीलालबरोबर सौंदर्यखणी शोभना समर्थ यांची जोडी खूप गाजली. ‘दो खरब जन’, ‘दो दीवाने’ (१९३६), ‘कोकिला’ (१९३७) हे त्यांचे चित्रपट. त्या काळातील धार्मिक चित्रपटातील प्रसिद्ध कलाकार प्रेम अदीबबरोबरही त्यांची जोडी जमली. ‘निराला हिंदुस्थान’ (१९३८) या सामाजिक चित्रपटानंतर ११ चित्रपटांत ही जोडी कायम होती. ‘साधना’ (१९३९), ‘सौभाग्य’ (१९४०), ‘भरतमिलाप’, ‘स्वामीनाथ’ (१९४२), ‘रामराज्य’ (१९४३), ‘उर्वशी’ (१९४६), ‘विधरांगणा’ (१९४७), ‘रामबाण’ (१९४८), ‘रामविवाह’ (१९४९), ‘रामायण’ (१९५४). राम-सीतेच्या भूमिकेतील ही जोडी भारतभर पसंतीस उतरली. या जोडीची राम-सीताच्या चित्रांचे कॅलेंडर्स त्या काळात घरोघरी दिसत होते. त्यातही ‘रामराज्य’ या चित्रपटाने तिला सर्वोत्कृष्ट नायिकेचा दर्जा दिला. आजही त्या काळातील लोक तिची ओळख ‘रामराज्य’मधील सीता म्हणूनच सांगतात. 

प्रारंभिक काळात तिने वास्ती, नझिर, बलवंतसिंग, याकूब, हरीश, चंद्रकांत जयराज, शाहू मोडक, अरुण आहुजा (गोविंदाचे वडील), चंद्रमोहन इ. बरोबर अनेक चित्रपटात कामे केलीत. १९४५ मध्ये पृथ्वीराज कपूर बरोबर ‘श्रीकृष्णार्जुन युद्ध’ व ‘नलदमयंती’मध्ये कामे केलीत. त्याच वर्षी ‘वीर कुणाल’ चित्रपटात मुबारक बरोबर सम्राट अशोकाची राणी ‘तिष्यरक्षिता’चे काम करून अभिनयाची सर्वोत्कृष्ट उंची गाठली. १९४९मध्ये शोभना पिक्चर्स नामे स्वतःची निर्मिती करून ‘हमारी बेटी’ चित्रपट काढला. यात तिने आपली ज्येष्ठ कन्या नूतनला नायिकेचा रोल दिला. त्यांनी १९६० साली ‘छबिली’ चित्रपटाद्वारे दुसरी कन्या तनुजाला चित्रपटात आणले. शोभना समर्थ यांचे निधन नऊ फेब्रुवारी २००० रोजी झाले. 
.........
खुर्शीद उर्फ मीना शौरी
१७ नोव्हेंबर १९२१ रोजी पाकिस्तानात क्वेट्टा येथे मीना शौरी यांचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव खुर्शीद जेहान. एके काळच्या लारीलप्पा गर्ल या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या चित्रपटाची नायिका विनोदी अंगाने सादर करू शकणारी भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. १९४१ साली सोहराब मोदी यांच्या ‘सिकंदर’मध्ये काम करून मीना शौरी यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. सोहराब मोदींनीच खुर्शीदचे मीना नामकरण केले. सोहराब मोदींच्या पुढच्या ‘फिर मिलेंगे’, ‘पृथ्वी वल्लभ’ आणि ‘पत्थरों के सौदागर’ या तिनही चित्रपटात खुर्शीद होत्या. पृथ्वी वल्लभ हापण एक कॉश्च्युम ड्रामाच होता. हाही चित्रपट खूप यशस्वी झाला. मीना यांना खूप कमी काळातच असे चित्रपट मिळाले जे करिअरच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले.

सिकंदर चित्रपटाच्या दरम्यान याच चित्रपटातील एक अभिनेता जहूर खान याच्या प्रेमात खुर्शीद पडल्या आणि दोघांनी लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी दुसरे लग्न केले ते अल् निसार यांच्याशी. पण दोघांचे सूर काही जुळले नाही. ते वेगळे झाले. मीना शौरी यांनी १९४०पासून १९६२पर्यंत एकूण पाच लग्ने केली; पण जे लग्न सगळ्यात जास्त टिकले ते रूप के. शौरी यांच्यासोबत (१९४६ ते १९५६) आणि त्या पुढे मीना शौरी या नावानेच पुढे आयुष्यभर ओळखल्या गेल्या. पूर्वी चित्रपटसंस्थेबरोबर अभिनेत्याचे करार होत असत. त्यामुळ इतर कंपनीचे चित्रपट करता येत नसत. रूप के. शौरी हे तेव्हाच्या बलुचिस्तानमध्ये जन्मलेले आणि नंतर मुंबईत आलेले चित्रपट क्षेत्रातील एक निर्माते दिग्दर्शक. त्यांना मीनाला आपल्या ‘शालीमार’ या चित्रपटासाठी साईन करायचे होते पण करारामुळे अडचण येत होती. मीना शौरी या सोहराब मोदी यांची पत्नी मेहताब यांच्यामार्फत हा करार तोडण्यात यशस्वी झाल्या. १९४८ला चमन या पंजाबी चित्रपटात त्या झळकल्या, दिग्दर्शक होते रूप. के. शौरी. हा चित्रपट हिट झाला.

१९४९मध्ये रूप के. शौरी यांनी पुढचा चित्रपट बनवला ‘एक थी लडकी’. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध हास्य अभिनेते आय. एस. जोहर यांनी लिहली होती. या चित्रपटाला विनोद नावाच्या संगीतकाराने संगीत दिले होते. या चित्रपटात एक गाणे होते- ‘लारा लप्पा..लारा लप्पा... लायी रख दी’ हे गाणे या चित्रपटाचा प्रमुख आकर्षणबिंदू होता. लता मंगेशकर यांचे हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. आजही या गाण्याची चाल, ठेका व मधुर आवाज मनाला भूरळ पाडतात. या गाण्यातील मीनाच्या ओठांच्या हालचाली आणि लतादीदीचा आवाज अगदी परफेक्ट जसा जुळला होता, तसेच मीना यांनी गाण्यावरचा अभिनय कसा असतो हेही दाखवून दिले. मीना शौरी यांनी १९५५पर्यंत भारतीय सिनेमात नाव आणि पैसा कमावला; पण १९५५नंतर त्या पाकिस्तानात गेल्या. भारतात २७ व पाकिस्तानात २९ असे एकूण ५६ त्यांनी चित्रपट केले. मीना शौरी या पाकिस्तानातील पहिल्या लक्स गर्ल ठरल्या होत्या.

मीना शौरी यांचे नऊ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.

माहिती संकलन : संजीव वेलणकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZVYCJ
Similar Posts
बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, लालन सारंग, पंडितराव नगरकर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे, लालन सारंग, पंडितराव नगरकर यांचा २६ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...
साधनाताई आमटे - ‘पुलं’च्या नजरेतून... पु. ल. देशपांडे या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं ‘गुण गाईन आवडी’ या पुस्तकात अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिलं आहे. त्या पुस्तकातच ‘बाबा आमटे : एक विज्ञानयोगी’ या १९६८ सालच्या मे महिन्यात लिहिलेल्या लेखाचाही समावेश आहे. बाबा आणि साधनाताई ही दोन नावं एकमेकांपासून वेगळी करता येण्यासारखी नाहीत
आनंदवनीचा श्रमर्षी ओसाड, दगडांच्या प्रदेशामधून आनंदवन नावाचं नंदनवन उभे करणारे असामान्य दाम्पत्य म्हणजे बाबा आमटे आणि साधनाताई आमटे. नऊ फेब्रुवारी हा बाबा आमटे यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, आनंदवनाच्या भेटीच्या आणि साधनाताई-बाबांच्या आनंददायी फोटोसेशनच्या आठवणी शब्दबद्ध करणारा, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख
पीडितांचे ‘बाबा’ आधुनिक भारताचे संत, साक्षात करुणामूर्ती, समाजसेवक बाबा आमटे यांचा आज (२६ डिसेंबर) जन्मदिन! कुष्ठरोग निवारणापासून ‘भारत जोडो’ आंदोलनापर्यंत विविध आघाड्यांवर अविरत कार्य करणाऱ्या या खऱ्या कर्मयोग्याला शतश: वंदन!

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language